नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे. विद्यापीठाच्या आवारात या महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या घटनेच्या तपासाबद्दल माहिती देताना उपायुक्त तिर्की म्हणाले की, संशयितांना पोलीस नोटिसा बजावून त्यावर त्यांचं स्पष्टीकरण घेण्यात येईल.

विद्यापीठाची नोंदणी प्रक्रिया तोडण्यासाठी प्रशासकीय ब्लॉकमधील सर्व्हर रूममध्ये तोडफोड करणाऱ्या गटांमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशी घोष यांना देखील पाहिलं गेलं असल्याचं तिर्की यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांपैकी बर्यााच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोंदणी करायची होती, परंतु हे लोक या विद्यार्थ्यांना नोंदणी करायला परवानगी देत नव्हते, असं तपासात पुढं आलं आहे. तसंच, या हिंसाचारात विशिष्ट विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

या हिंसक घटनेत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. जेएनयू हिंसाचाराच्या घटनेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यांबाबतचा तपास गुन्हे शाखा करत आहे, असं दिल्ली पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी सांगितलं. या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रकारची चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे, असं ते म्हणाले.