नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सुरक्षा जवान जसे देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर सज्ज असतात आणि शत्रूला नेस्तनाबुत करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात त्याचप्रमाणे हे जवान गरजवंतांना मदतीचा हात देऊन मानवता धर्मही जोपासत आहेत. अशीच एक घटना घडली आणि या जवानांनी एका गरोदर महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचवलं त्यानंतर या महिलेनं एका मुलाला जन्म दिला.

जम्मू काश्मीरमध्ये गेलेलं काही दिवस मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातल्या एका गावातून लष्कराच्या जवानांना एका महिलेच्या प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यासंदर्भात कळवण्यात आलं. तात्काळ लष्कराच्या डॉक्टरांनी ते गाव गाठलं. आणि या महिलेवर उपचार करायला सुरुवात केली.

या महिलेला बारामुल्लाच्या रुग्णालयात हलवण्यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे पाच फूट असलेला बर्फ बाजूला करत जवानांनी हेलिपॅड स्वच्छ केलं दुस-या  बाजूला रुग्णवाहिका नेण्यासाठी उपलोना ते बारामुला या रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचा जकाम जवान करत होते.

लष्कराचे १०० जवान आणि ३० सामान्य नागरिकांनी या गरोदर महिलेला सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रुग्णालयात पोहोचवलं या महिलेनं तिथं एका गोंडस बाळाला जन्म  दिला.