नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक्त विचार, भिन्नविचारां प्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत.
मोदी यांनी कोझीकोड इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. आज जगभरात द्वेष, हिंसा, मतभेद आणि दहशतवादापासून सुटका मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशा परिस्थितीमधे भारतातली जीवनपद्धती म्हणजे जगासाठी आशेचा किरण आहे असं ते म्हणाले.
भारतात कोणताही मतभेद बळाच्या जोरावर नाही, तर संवादाच्या आधारे सोडवला जातो असंही मोदी यांनी अधोरखित केलं. अनेक पाश्चात्य देशांनी महिलांना मताधिकार देण्यासाठी अनेक दशकांची वाट पाहिली, मात्र भारताच्या घटनाकारांनी पहिल्या दिवसापासूनच महिलांना मताधिकार दिला असं मोदी यांनी नमूद केलं. भारतीय विचारधारेनंजगाच्या जडणघडणीत आजवर मोठं योगदान दिलं असून, आजही ही क्षमता कायम असल्याचं ते म्हणाले.
महात्मा गांधींनी कायमच शांततेच्या तत्वाचा पुरस्कार केला आणि त्याद्वारे भारताला स्वातंत्र्यही मिळवून दिलं असं मोदी यांनी सांगितलं. दया, सलोखा, न्याय,सेवाभाव आणि मुक्त विचार ही भारतीय विचार धारेच्या केंद्रस्थानी असलेली तत्व, भारतीय जीवनपद्धतीचा गाभा आहेत असंही मोदी म्हणाले.