नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा चीननं विचार करावा आणि काश्मीरचा मुद्दा मांडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानाला पाठबळ देणं बंद करावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते.

चीनच्या पाठिंब्याच्या जोरावर, पाकिस्ताननं काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करत, सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. हे व्यासपीठ अशा विषयांसाठी नाही, तसंच हा भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा आहे, असंच सुरक्षा परिषदेच्या अनेक सदस्यांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलं.

पाकिस्ताननं काश्मीरमधल्या स्थितीबाबत केलेल्या आरोप विश्वसनीय नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न फसले असं रवीश कुमार म्हणाले.