बारामती : सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील सध्या सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या विकासकामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर, उप विभागीय कृषी अधिकारी बालाजी ताठे, भूमि अभिलेखचे अधिक्षक शिवप्रसाद गौरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या या पाहणी दौ-यामध्ये बारामती एस.टी.बसस्थानक, एमआयडीसी येथील एस.टी. बस डेपो, पोलीस वसाहत, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह तसेच नियोजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय इ.ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता संजयकुमार तांबे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सध्या बांधकाम आराखडयानुसार सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याठिकाणी बारामतीच्या हवामानामध्ये टिकून राहणा-या वृक्षांची लागवड करावी, आसपासचा परिसर सुशोभित असावा, कामाच्या ठिकाणी येणा-या नागरीकांना प्रसन्न वाटावे अशा प्रकारचे वातावरण असावे, भूमीगत विद्युत तारा बसविण्यात याव्यात, पुणे शहरामध्ये बांधकाम करण्यात येत असलेल्या पोलीस वसाहतींच्या इमारतींच्या आराखडयाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे बारामती येथील पोलीस वसाहतीचा प्लॅन तयार करावा, एस.टी. बसस्थानक परिसरातील स्वच्छता व पार्कींग व्यवस्थेबाबत संबंधितांना सूचना केल्या.
यावेळी उपस्थित अधिका-यांना विकासकामांकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर वेळेत करावा तसेच वाढीव निधीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करावेत जेणेकरुन वाढीव निधीची तरतूद करणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.