मुंबई : चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपायासाठी केलेल्या सूचनेनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. गेल्या पाच दिवसांत 189 जणांची तपासणी करण्यात आली असून एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
महिन्याभरापूर्वी करोना व्हायरसची लागण चीनमधल्या शहरात झाली असून 41 रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने याबाबत चाचणी केली त्यानुसार त्यांनी जगभर खबरदारीचा इशारा दिला आहे.
करोना व्हायरसमुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी जाणवते. वेळीच उपचार केला नाही तर न्यूमोनिया होतो. अशी लक्षणे आढळून येत असून केंद्रीय आरोग्य विभागाने त्याची दखल घेत सर्व राज्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील आरोग्य विभागामार्फत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनर बसविले आहे. त्याद्वारे चीनवरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाते. गेल्या पाच दिवसांत दहा डॉक्टरांच्या पथकाच्या माध्यमातून 189 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये एकही संशयित रुग्ण सापडला नाही, असे स्पष्ट करतानाच नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.