नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राच्या विविध गटांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली.
ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक पायाभूत विकासाला चालना तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून बेरोजगारी आणि गरीबी दूर करण्याच्या उपाययोजनांवर अर्थमंत्र्यांनी भर दिला. कृषी क्षेत्राच्या समस्यांना विद्यमान सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांशीही अर्थ मंत्रालय व्यापक चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी उत्पादनांसाठी बाजारपेठा उपलब्ध करुन देणे आणि ग्राहकांना किफायतशीर दरात कृषी उत्पादनं पुरवण्यासाठी ‘स्टार्ट अप’ ने प्रोत्साहन देण्यावर सीतारामण यांनी भर दिला.
या बैठकीत कृषी संशोधन, ग्रामीण विकास, बिगर कृषी क्षेत्र, अन्न प्रक्रिया, पशुपालन, मत्स्य उद्योग आणि स्टार्ट अप या क्षेत्रांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.
अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, वित्त सचिव सुभाष गर्ग तसेच अन्य विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान कृषी आणि ग्राम विकास क्षेत्राच्या प्रतिनिधींनी कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विविध सूचना सादर केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची सूचनाही करण्यात आली.