पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना समर्थ भारत परिवार या सामाजिक संस्थेकडून या हिवाळ्यामध्ये स्वेटर्स भेट देण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी बहुल भागामध्ये हिवाळ्याची तीव्रता जास्त असल्याने प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना हे स्वेटर्स भेट देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर पठाण यांनी सांगितले. हे स्वेटर्स या भागातील बेंढारवाडी आणि माचीची वाडी या गावांतील पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळेत जाणाऱ्या 43 विद्यार्थ्यांना देण्यात आले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडे डोंगराळ भागात हिवाळा तीव्रतेने जाणवतो. या तीव्र थंडीपासून संरक्षण होण्यासाठी समर्थ भारत परिवाराकडून बेंढारवाडी आणि माचीची वाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्स चे मोफत वितरण केले आहे. या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब इंदोरे आणि मुख्याध्यापक संजयकुमार पडवळ यांनी संस्थेकडे पोहोचवल्याने या विद्यार्थ्यांना मदत मिळू शकल्याचे प्रतिपादन डॉ. समीर पठाण यांनी केले. यावेळी समर्थ भारत परिवार च्या सदस्य आणि एस. एन. डी. टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्मिता भोर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना बोलते केले.
स्वेटर वितरणाच्या या कार्यक्रमात समर्थ भारत परिवार, दुर्गसंवर्धन संस्था, राष्ट्रीय युवा परिषद आणि स्वयंसिद्धी फाउंडेशन यांनी सहकार्य केले, मुख्याध्यापक बाळासाहेब इंदोरे यांनी प्रास्ताविक केले, माचीची वाडी येथील मुख्याध्यापक संजयकुमार पडवळ, बेंढारवाडी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बेंढारी आणि माचीची वाडी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मंदा पोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, माजी अध्यक्ष दामोदर सुपे यांनी वितरणाची व्यवस्था पाहिली. यावेळी दगडू केंगले, किसन साबळे, अर्चना वळकोली आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सहशिक्षक विजय डोके आणि नामदेव बांबळे यांनी आभार मानले.