नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज राजधानी दिल्लीत होणार्या. मुख्य समारंभासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्विकारतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो आज राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभागी होणार आहेत. जम्मू आणि काश्मिर पहिल्यांदाच केंद्रशासित प्रदेश म्हणून या संचलनात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री राष्ट्रीय युद्ध् स्मारकाला भेट देणार आहेत. ध्वजारोहण झाल्या नंतर राष्ट्रसंगीत होईल आणि त्यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल. स्टार्ट अप इंडिया, जल-जीवन मिशन आणि आर्थिक समावेशकता या संकल्पनांचा समावेश काही मंत्रालयांनी तसंच विभागांनी केला आहे.

हवाई दलात यावर्षी नव्यानं समावेश केलेल्या चिनूक, अपाचे  हेलिकॉप्टरच्या तसंच सुखोई लढाऊ विमानांच्या हवाई कसरती यावेळच्या संचलनाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.  विविध पोलीस दलांसह निम लष्करी दल तसंच ६०० हून अधिक शालेय विद्यार्थी या संचलनात सहभागी होतील.