नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दररोजच्या परिस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः लक्ष ठेवून असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ देऊ नये, कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार पसरलेल्या कुठल्याही देशामध्ये जाऊन आलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवावं, त्यांना १४ दिवस घरात वेगळं ठेवावे, विद्यार्थ्यांमध्ये ताप, खोकला किंवा श्वासनाच्या त्रासाविषयी लक्षणं दिसली तर त्यांना तपासणीसाठी पाठववावं असं आवाहन या सूचनांमध्ये केलं आहे.
कोरोना विषाणूबाबत कुठल्याही माहितीसाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय चोवीस तास उपलब्ध असून, नागरिक ० १ १ – २ ३ ९ ७ ८ ० ४ ६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात, तसंच ncov2019@gmail.com या ईमेलआयडीवर कळवू शकतात.