नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा ६१ वा भाग असून यावेळी हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सर्वसाधारणतः हा कार्यक्रम ११ वाजता प्रसारित करण्यात येतो.
आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ‘मन की बात’ हा आपल्यासाठी विशेष कार्यक्रम असेल. या कार्यक्रमातून जनतेलाही आपले विचार मांडता येतील असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. लोकांना १८०० ११ ७८०० या क्रमांकावर आपला संदेश किंवा सूचना रेकॉर्ड करून नमो अप खुला मंच किंवा मायजीओव्हीवर आपल्या सूचना पाठवता येतील.
१९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक एसएमएस येईल. त्यात पाठवलेल्या लिंकवरही आपल्या सूचना देता येतील. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल. www.newsonair.com या संकेतस्थळावरही हा कार्यक्रम पाहता येईल. हिंदीत या कार्यक्रमाचं प्रसारण झाल्या नंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये याचं प्रसारण केलं जाईल. रात्री ८ वाजता या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण केलं जाईल