बारामती  : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळयामध्ये यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार कार्यवाही करुन हा सोहळा यशस्वी करावा, असे प्रतिपादन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले. बारामती तालुक्यातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर तहसिल कार्यालयामध्ये शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या बैठकीस तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी प्रमोद काळे, उपअधिक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे, सहा. पोलीस निरीक्षक एस.व्ही.लांडे तसेच विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. निकम म्हणाले, बारामती तालुक्यामध्ये मागील वर्षी पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर प्रशासनाकडून उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले होते. व त्यानुसार प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली होती. त्यामुळेच कोणतीही अडचण निर्माण न होता पालखी सोहळा यशस्वीपणे पार पडला. यावर्षी देखील शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून आपापल्या विभागांना नेमून दिलेल्या जबाबदा-या वेळेत पार पाडाव्यात, अशा प्रकारच्या सूचना केल्या.

पालखी काळात महावितरण विभागाकडून अखंडीतपणे वीज पुरवठा करण्यात यावा, डीपीला संरक्षण फेन्सींगची कामे करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालखी मार्गावरील रस्त्यांच्या खड्डयांची दुरुस्ती तसेच इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत.

सार्वजनिक वितरण विभागाने वारक-यांना रॉकेल किेंवा गॅस सिलींडरचा मागणीप्रमाणे पुरवठा करावा. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पुरेशी वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहीका, अत्यावश्यक सेवेसाठी खाजगी तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये राखीव बेडची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. अग्नीशमन यंत्रणा तत्पर ठेवणे. नगरपरिषदेने पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी उपलब्ध करावे. फिरते शौचालय उपलब्ध करावे.

पोलीस विभागाकडून पालखी विसावा, मुक्कामाचे ठिकाण तसेच पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवणे, वाहतुकीचे नियोजन करणे, गर्दीच्या ठिकाणी चोरांचा बंदोबस्त करणे, पालखी काळात कत्तलखाने आणि दारुची दुकाने बंद ठेवणे, पालखीच्या दरम्यान फटाके उडवू नयेत इ.प्रकारच्या सूचना केल्या.
या बैठकीच्या वेळी प्रांताधिकारी निकम यांनी वारक-यांना भोजन वाटप करताना थर्माकोलच्या पत्रावळी ऐवजी पानांच्या पत्रावळीचा वापर करावा. खाण्याच्या वस्तू अथवा पाणीचे वाटप करताना गर्दी होवू देवू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच चेंगराचेंगरी सारखे प्रकार टाळावेत, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पालखी काळात आपत्ती व्यवस्थापन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने नागरी संरक्षण विभागाला सूचना केल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आज बैठकीमध्ये नागरी संरक्षण विभागाकडून उपनियंत्रक अनिल आवारे, सहा.उपनियंत्रक मारुती गावडे व आनंदा शिंदे यांनी आपत्ती काळात तातडीने करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिके सादर केली.

या बैठकीनंतर प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन समिती,लोकशाही दिन,अवैध दारु प्रतिबंध समन्वय समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अपंग व्यक्तींना राखील 3 टक्के निधी, एकात्मिीक समन्वय समिती इ. विषयांच्या बैठका पार पडल्या. या बैठकांना तहसिलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य खलील काझी,प्रविण वाघमोडे,विश्वास मांढरे,प्रकाश देवकाते तसेच सदस्या विजया खोमणे इ. मान्यवर उपस्थिित होते.