5 व्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. संतुलित शरीर,मन आणि स्वास्थ्यासाठी योग हा उत्तम असल्याचे दिसून आले आहे. योग या विषयातील प्राविण्य, योग विषयात घेतलेले प्रशिक्षण याचा उपयोग करुन भारतीय योग शिक्षकांनी योग प्रशिक्षण हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
के.सी. महाविद्यालयात पाचव्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर,हैद्राबाद सिंद नॅशनल कॉलेजिअेट बोर्डाचे ट्रस्टी डॉ. निरंजन हिरानंदानी, बोर्डाचे ट्रस्टी आणि माजी अध्यक्ष अनिल हरीश, बोर्डाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, बोर्डाचे सचिव दिनेश पंजवानी,कैवल्यधामचे प्रशासक सुबोध तिवारी, के.सी. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता बागला,महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी,एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राव म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून या महाविद्यालयात योगदिनाचे औचित्य साधून योगविषयक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, याचा आनंद आहे. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनी राज्यातील सर्वात मोठे विद्यापीठ असणाऱ्या मुंबई विद्यापीठामार्फत अधिकाधिक विद्यार्थी, योग शिक्षक, प्राध्यापक यांचा सहभाग मिळवून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. आपल्या गुरुजनांनी ज्यांनी योग विद्या शोधून काढली, आत्मसात केली आणि त्याचा उपयोग मनुष्याचे आयुष्य उंचावण्यासाठी केला अशांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे हा एक प्रकारे गौरवच आहे.
भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे की, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस फक्त भारतातच नाही तर न्यूयॉर्क, लंडन, बिजिंग,टोकिओ, दक्षिण अफ्रिका आणि उर्वरित देशांमध्येही साजरा करण्यात येणार आहे. आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. कामाच्या वेळा, खाण्याच्या सवयी,कामाचा ताण, झोपेची कमतरता या सर्वांमुळे आज आपल्याला प्रत्येकाला तणावाला सामोरे जावे लागते. तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करणे आवश्यक असल्याचेही राज्यपाल श्री. राव यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
योग हा फक्त व्यायाम नसून योग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते हे दिसून आले आहे आणि त्यामुळेच आजच्या नागरिकांना विशेषत: तरुणांना आवाहन करतो की, योग आपली परंपरा असून ही परंपरा टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपण घेणे आवश्यक आहे. भारताची आजच्या घडीला सर्वात मोठी शक्ती ही युवाशक्ती आहे. आज सर्वांत तरुण लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख बनली असून पुढील वर्षी भारताच्या लोकसंख्येचे सरासरी वय हे 29 वर्षे असणार आहे जे अमेरिकन आणि चीन या राष्ट्रांपेक्षा 8 वर्षाने लहान असणार आहे. आजच्या युवकांना निरोगी आयुष्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यांवर आधारित रोजगार मिळाल्यास येणाऱ्या काळात भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असेही राज्यपाल श्री. राव यांनी नमूद केले.