नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. याशिवाय, उद्योग मंत्रालयाचे सचिव, आणि रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर उपस्थित होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत डेटा संरक्षण आराखडा तयार करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. यातून माहितीची गोपनीयता जपली जाईल शिवाय जगातिक स्तरावर तंत्रज्ञान उद्योगात भारताचे स्थान अधिक भक्कम होईल.
यावेळी उपस्थित सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी रिजर्व्ह बँकेच्या माहिती संकलन विषयक गरजा आणि प्रक्रियांविषयी येणाऱ्या अडचणी आणि समस्या मांडल्या. रिझर्व बँक ह्या समस्यांचा विचार करेल,असे आश्वासन बँकेचे डेप्युटी गव्हर्नर बी पी कानगो यांनी दिले.
तसेच ई-वाणिज्य उद्योगातील प्रतिनिधींनी देखील वाणिज्य मंत्र्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. ई-वाणिज्य धोरणाचा मसुदा तयार करताना त्यांच्या सूचना आणि मागण्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, अशी तक्रार ह्या प्रतिनिधींनी केली. ह्या तक्रारी लिखित स्वरूपात मंत्रालयाकडे दहा दिवसात सादर कराव्यात, त्यांची निश्चित दखल घेतली जाईल,आसे आश्वासन गोयल यांनी यावेळी दिले.