मुंबई : सुट्या तेलाच्या पॅकिंग व दर्जावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असून, सीजीएसआयच्या अहवालानुसार खाद्यतेलात भेसळ आढळून आली असल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली.
आज विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी राज्यात खोबरेल, शेंगदाणा व तिळाच्या तेलामध्ये पामतेलाच्या भेसळीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री येरावार बोलत होते.
श्री. येरावार म्हणाले, पदार्थांची तपासणी सीजीएसआय या प्रतिष्ठित संस्थेमार्फत करण्यात येते. फक्त भेसळच नाही तर अन्नपदार्थांची गुणवत्ताही तपासण्यात येते. राज्यभरात ९६३ तपासण्या करण्यात आल्या असून, ३ कोटी ५२ लाख ७८ हजार ८२० रकमेइतका साठा जप्त करण्यात आला आहे. सीजीएसआयने केलेल्या कारवाईनुसार ६० टक्के खाद्यतेलात भेसळ आढळून आली असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. येरावार यांनी दिली.
यावेळी सदस्य सर्वश्री सुनिल देशमुख, जयप्रकाश मुंदडा, सुनिल प्रभू, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.