जुलै निम्मा सरला तरी मान्सूनने म्हणावी तशी सर्वदूर हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सूनचे गणित काहीसे बिघडलेले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून देशभरात सक्रिय झालेला असतो.

यंदा अद्यापही मान्सूनचा प्रवास सुरूच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या अहवालानुसार आतापर्यंत देशातील एकूण ३६ हवामान विभागांपैकी केवळ १२ विभागांत समाधानकारक पाऊस झाला आहे, तर २४ हवामान विभागांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. जुलैच्या मध्यात देशात पावसाची १७ टक्के तूट आहे. खरे तर जुलै हा हमखास पावसाचा महिना.

जूनअखेर तसेच जुलैमध्ये पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर सक्रिय झालेल्या मान्सूनने जूनमधील तूट काही अंशी भरून काढली असली तरी विदर्भ, मराठवाडा, बुंदेलखंड, तेलंगण, मध्य कर्नाटक आदी भागात पाणीटंचाईचे संकट कायम आहे. गतवर्षीच्या कोरड्या पावसाळ्यामुळे मराठवाड्यातील परिस्थिती यंदा अधिकच बिकट झाली आहे. ११५ वर्षांतील सर्वात कोरडा सप्टेंबर अनुभवणाऱ्या मराठवाड्यावर यंदा लांबलेल्या आणि सुस्तावलेल्या मान्सूनमुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती उद्भवली आहे. राज्यातही कोकण वगळता ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई आहे. सध्या राज्यातील एकूण ३२६७ लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांत १५.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात २७.४८ टक्के पाणीसाठा होता. औरंगाबाद विभागातील उपयुक्त पाणीसाठा फक्त ०.८४ टक्के आहे. अमरावती विभागात ८.३४ टक्के, नागपूर ८.६४ टक्के, नाशिक १०.९१ तर पुणे विभागात २३.२५ टक्के असा उपयुक्त पाणीसाठा आहे.

राज्यात सध्या ४५३२ टँकर सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १६८४ टँकर औरंगाबाद विभागात सुरू आहेत, यावरून मराठवाड्यातील टंचाईच्या भीषणतेची कल्पना यावी. खरिपाची स्थिती याहून वाईट आहे. आषाढी एकादशी तोंडावर आली तरी बऱ्याच भागात अद्याप तिफणीवर मूठ बसलेली नाही.

पावसाने ओढ दिल्याने मृग, आर्द्रापाठोपाठची नक्षत्रे कोरडी गेली. मूग, उडीद यासारखी कमी कालावधीची पिके हातातून गेल्यात जमा आहेत. जुलैमधील पावसाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बदलते हवामान, कमी काळात जास्त पाऊस, कोरड्या दिवसांचे वाढते प्रमाण ही अलीकडील काळातील मान्सूनची वैशिष्ट्ये राहिली आहेत. हे लक्षात घेऊन त्यानुसार पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे नियोजन होणे ही काळाची गरज बनली आहे. त्यानुसार जलसंधारण, मृदसंधारण, राज्यातील पाणीवाटप, विभागवार पाणीवाटपाच्या नियोजनासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. वारी संपत आली तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस नसल्याने वारीतला शेतकरी विठ्ठलाकडे आता एकच मागणं मागेल… पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी… निढळावर हात ठेवून वाट मी किती पाहू? खिंडीतोंडी हटवाद्या नको उभा राहू!