मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील प्रचारासाठी सांगली इथे झालेल्या संयुक्त प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

सध्याची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. कोविड महामारीमुळे विधिमंडळाचे एक अधिवेशन होऊ शकते नाही, त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या. याचा अर्थ आम्ही भरतीला स्थगिती दिली, असा होत नाही, असे ते म्हणाले.

पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, शिक्षकचे उमेदवार जयंत आसगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

अर्थकारण आणि बेरोजगारी हे प्रश्न बिकट बनले आहेत, तेव्हा ते सोडवायला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.