सुषमा स्वराज यांनी केवळ ते टिकविले नाही तर आपली उंचीही सतत वाढवत नेली. राजकीय आणि सार्वजनिक चारित्र्य जपले. देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात आपली सात्त्विक, न्यायप्रिय आणि लढाऊ छबी कायमची कोरून ठेवली. आणीबाणीनंतर अवघे पंचवीस वय असताना त्यांना १९७७ मध्ये हरयाणात देवीलाल यांच्या जनता सरकारमध्ये त्या मंत्री बनल्या. हा विक्रम अजून अबाधित आहे! मात्र, जाट नेते असलेल्या देवीलाल यांनी ‘अकार्यक्षमेतचा ठपका’ ठेवून सुषमांना मंत्रिमंडळातून थेट काढूनच टाकले. तेव्हा पक्षाध्यक्ष चंद्रशेखर यांना ‘तुम्ही सुषमांना परत घेतले नाहीत तर पक्षाध्यक्ष म्हणून मी तुमचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून टाकीन..’ असा दम द्यावा लागला होता. महिलांच्या कारकिर्दीत कशी संकटे असतात, याचे हे उदाहरण. सुषमांनी पुढे कधीही याचा उल्लेख केला नाही किंवा कटुता बाळगली नाही.
१९८० पर्यंत समाजवादी परिवाराच्या जवळ असणाऱ्या सुषमा जनता पक्ष फुटला, तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षात आल्या. आपल्या गुणांनी, अमोघ वक्तृत्वाने आणि आक्रमकतेने पक्षात महत्त्वाच्या नेत्या बनल्या. भाजप किंवा त्याआधी जनसंघात केवळ राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या रूपाने सोज्ज्वळ व सत्त्वशील राष्ट्रीय महिला नेतृत्व होते. सुषमांनी या गुणांमध्ये लढाऊपणाची व आक्रमकतेची भर घातली. पंतप्रधान होऊ न शकलेले म्हणून अनेक अलौकिक नेत्यांची नावे घेतली जातात. या यादीत साजेल असे सुषमा स्वराज यांचे नाव होते. डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार दुसऱ्यांदा आले, तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सुषमा स्वराज यांच्यावर सोपवली. ती त्यांनी ज्या सहजतेने तसेच सत्ताधाऱ्यांशी व मध्यंतरी निर्माण झालेली कटुता विसरून सोनिया गांधींशी संवाद साधत पार पाडली. ही हातोटी विलक्षण होती.
पक्षातील बरोबरीच्या काही स्पर्धक नेत्यांनीही त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले. मात्र, एव्हाना लोकनेत्या बनलेल्या सुषमा स्वराज समंजस राजकारण करीत त्यांना पुरून उरल्या. अयोध्येच्या आंदोलनाच्या आसपास भाजपला अनेक महिला नेत्या मिळाल्या. पण सुषमांचा सुसंस्कृतपणा, आधुनिकतेशी असणारे त्यांचे नाते आणि व्यापक दृष्टी यामुळे त्या सर्वांहून वेगळ्या ठरल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खाती सांभाळली. त्यात चित्रपट उद्योगाला ‘इंडस्ट्री’चा दर्जा देण्यासारखा दूरगामी निर्णयही घेतला. पण त्यांच्यासमोर खरे आव्हान होते, ते नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खाते सांभाळण्याचे. एकतर मोदी त्यांना राजकारणात पुष्कळ ज्युनियर होते.
दुसरे, परराष्ट्र धोरण स्वत:च चालविण्याचा मोदींचा विचार पहिल्या काही दिवसांतच स्पष्ट झाला. मात्र, निराश न होता सुषमा स्वराज यांनी आपला ठसा उमटविला. त्यांनी जगभरातल्या भारतीयांशी, कुठल्याही देशात संकटात सापडणाऱ्या भारतीयांशी नाते जोडले. त्यांना संकटातून सोडवले. प्रत्येक ट्वीटची दखल घेत जमेल तितकी मदत वेगाने देऊ केली. त्यांनी कशी मदत केली, याच्या आज ज्या शेकडो कहाण्या सोशल मिडियावर सांगितल्या जात आहेत, ही सुषमा स्वराज यांची कधीही न संपणारी पुण्याई आहे. याआधी परराष्ट्र खाते हे असे लोकाभिमुख खाते कधीही बनले नव्हते. इतके की, नवे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना सुषमा स्वराज यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम चालू राहतील, हे पहिल्याच संवादात सांगावे लागले. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात अनेक सहकारी मंत्री जग सोडून गेले.
तेव्हाच आजार बळावलेल्या सुषमा स्वराज व अरुण जेटली या खंद्या सहकाऱ्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात प्रकृतीच्या कारणाने जाता आले नाही.
या चार दशकांच्या यशस्वी कारकिर्दीला सुषमांनी अतिशय शांत मनाने निरोप दिला होता. तरीही, सगळ्या घडामोडींकडे त्या किती बारकाईने पाहात, हे त्यांच्या अखेरच्या ट्वीटवरून सर्वांना समजले. स्त्री स्वातंत्र्याची सारी मूल्ये भारतीयत्वात मुरवून कारकीर्द कशी घडवायची, फुलवायची याचे सुषमा स्वराज हे प्रसन्न, आश्वासक उदाहरण होते. आज लोकसभेत विक्रमी महिला खासदार आहेतच, पण देशभर लाखो महिला सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत.