मुंबई : एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन दर्शविणाऱ्या तसेच ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारित करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजू शकणार आहे. तसेच बसस्थानकावर एलसीडी टीव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार आहे. आपल्या जवळील थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या व सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ कळणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे पूर्वनियोजन करता येईल व त्यांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.
एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग व मुंबई – पुणे – मुंबई, बोरीवली – पुणे -बोरीवली, ठाणे – पुणे – ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हीटीएस – पीआयएस प्रकल्पाचा आज लोकार्पण करण्यात आला. पुढील ५ ते ६ महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांना व्हीटीएस (vehicle tracking system)बसविण्यात येऊन सर्व महत्त्वाच्या थांब्यावर पीआयएस संच (passenger information system) बसविण्यात येणार आहे. याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच प्रवाशांना बसचे लोकेशन समजण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येत असून ते लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
प्रणालीच्या प्रारंभप्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल,महाव्यवस्थापक राहूल तोरो,उपमहाव्यवस्थापक सुहास जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. दिवाकर रावते म्हणाले, ‘जिथे रस्ता, तिथे एसटी’ या ब्रीदवाक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी महामंडळ सेवा देत आहे. महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बस असून त्यामार्फत दररोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणणे तसेच संपूर्ण कार्यक्षमतेने काम होण्यासाठी एसटी महामंडळाध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीत वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना एसटी बसचे प्रत्यक्ष स्थान कळणार आहे. प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या एसटी बस थांब्याचे, गावांचे जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे अक्षांश व रेखांशाद्वारे नकाशावर स्थान निश्चित करण्यात येत आहे. तसेच ज्या आंतरराज्य मार्गावर एसटी महामंडळाची सेवा आहे, अशा थांब्यांचेही स्थान निश्चितीकरण करण्यात येत आहे.
व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई सेंट्रल येथे तयार करण्यात आलेली आहे. या नियंत्रण कक्षामध्ये व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली असून तेथे एसटी बसेसचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन व निर्गमन तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक अहवाल प्राप्त होणार आहे.