मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्काऊट गाईडपॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान समारोह शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

स्काऊट गाईड चळवळ ही लॉर्ड बेडन यांनी 1907 मध्ये लंडन येथे ब्राऊनसी बेटावर सुरु केली. भारतात 1909 मध्ये ही चळवळ आली. सुरुवातीला केवळ ब्रिटिश व अँग्लो इंडियन मुलांनाच या चळवळीत प्रवेश होता. मात्र चळवळीची गुणवत्ता लक्षात आल्यावर डॉ.ॲनी बेझंट, डॉ.जी.एस.अरुंडेल, पं.मदन मोहन मालवीय, पं.हृदयनाथ कुंझरु,पं.श्रीराम वाजपेयी या नेत्यांच्या प्रयत्नांनी भारतीय मुलांनाही या चळवळीत प्रवेश करता आला. स्काऊट गाईड ही सेवाभावी, आंतरराष्ट्रीय सर्वधर्म समभाव जोपासणारी चळवळ आहे. चारित्र्य संवर्धन आणि युवकांचा सर्वांगीण विकास हे ह्या चळवळीचे उद्दिष्ट आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर गाईडर पुरस्कार प्रा.टी.पी.महाले जीवनगौरव पुरस्कार, बार-टु-मेडल ऑफ-मेरिट 6 आणि राज्य पुरस्कार स्काऊट 73 गाईड 73 पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. स्काऊट गाईड चळवळीसाठी जीवनभर सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रा.टी.पी.महाले जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. तसेच आपापल्या शाळांमध्ये सातत्याने स्काऊट गाईडचे युनिट चालवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्काऊट गाईडच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर गाईडर पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. राज्यस्तरीय सर्वोच्च परीक्षा राज्य पुरस्कार उत्तमरितीने उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय यावर्षी एक विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. स्काऊट गाईड चळवळीत अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या बीड जिल्हा संस्थेचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्रशासक मंडळ सदस्य, संतोष मानूरकर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.