नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. 10 व्या फेरीचे काम पूर्ण झाल्यानंतर नगर गॅस वितरणाची व्याप्ती देशातल्या 70 टक्के लोकसंख्येपर्यंत आणि 52.73 टक्के क्षेत्रापर्यंत पोहोचेल.
गेल्या 5 वर्षात देशांतर्गत पीएनजी (पाइपद्वारे नैसर्गिक गॅस) जोडणी, सीएनजी वाहने आणि सीएनजी केंद्रांची संख्या दुप्पट झाली असल्याचे प्रधान यांनी यावेळी सांगितले. भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाचा उर्जेचा वापरकर्ता असून, दशकभरात तो अव्वल स्थानी पोहोचेल.
सर्वांसाठी ऊर्जेचे भरवशाचे, परवडणारे, शाश्वत आणि स्वच्छ स्रोत पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
देशांतर्गत गॅस उत्पादन 2018-19 मध्ये 32.87 अब्ज घनमीटर होते ते 2020-21 मध्ये 39.3 अब्ज घनमीटरवर पोहोचण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. सध्या गॅसग्रीड 16,788 किलोमीटर असून, अतिरिक्त 14,788 किलोमीटर जाळ्यासाठी काम प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले.