पुणे – दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या दहावीच्या शाळेतून माहिती पुस्तक आणि येणारे लॉगिन आयडी, पासवर्ड विकत घ्यायचा आहे. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य मार्गदर्शन केंद्रांवर उपलब्ध असेल. अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल.
भाग एक भरताना
संगणकावर दिलेल्या सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने ऑनलाइन अर्ज भरा. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेस नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल, ती तपासून घ्या.
आपोआप येणाऱ्या वैयक्तिक माहितीमध्ये काही चूक आढळल्यास त्यामध्ये शाळा वा मार्गदर्शन केंद्रातून दुरुस्ती करून घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर बैठक क्रमांक टाकल्यावर येणार नाही, त्यांनी तसेच अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सर्व माहिती स्वतः भरावयाची आहे.
अर्ज शक्यतो आपली शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रातून भरा व संपूर्ण अर्ज (भाग-एक) भरून झाल्यानंतर अर्जातील माहिती (स्वत:चे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, प्रवर्ग, आरक्षण, मोबाईल नंबर इत्यादी) अचूक असल्याचे आपल्या शाळेतून वा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित (अप्रूव्ह) करून घ्या.
अर्ज प्रमाणित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दाखवा. प्रमाणित केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या व ती जपून ठेवा.
विद्यार्थी फॉर्म प्रमाणित करून घेणार नाहीत त्यांचा अर्ज अपूर्ण म्हणजे (पेंडिंग) राहील आणि अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशप्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच त्यांना भाग दोन (पसंतीक्रम) भरता येणार नाही. त्यासाठी फॉर्म भरून झाल्यावर (माय स्टेटस) तपासावे. ते प्रमाणित (अप्रूव्हड्) असणे आवश्यक आहे. तरच भाग दोन पसंतीक्रम भरता येईल.
संकेतस्थळ : https://pune.११thadmission.net
अर्जाचा भाग एक भरताना…
अर्ज कसा भरावा
आपल्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रवेशप्रक्रियेची माहितीपुस्तिका खरेदी करा.
नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचा आणि संपूर्ण प्रवेशप्रक्रिया समजून घ्या. त्यासाठी आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या.
ऑनलाइन प्रवेश क्षेत्रनिहाय योग्य संकेतस्थळ उघडा.
माहितीपुस्तिकेमध्ये लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिले आहेत, त्याचा प्रथम लॉगीन करण्यासाठी वापर करा. नंतर पासवर्ड बदला आणि पुढच्या वेळेस लॉगीन करण्यासाठी तो लक्षात ठेवा. (पासवर्ड बदलला तरी पूर्वीचा पासवर्डसुद्धा जपून ठेवा.)
सिक्युरिटी प्रश्न निवडा आणि त्याची योग्य उत्तरे द्या. ती लक्षात ठेवा.
सिक्युरिटी प्रश्न व पासवर्ड याची प्रिंट घेऊन ती जपून ठेवा. आपला पासवर्ड इतर कोणासही सांगू नका.
अकरावी प्रवेशासाठी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच भाग एक भरण्यास सुरवात करावी. या भागात आरक्षण विषयक माहिती द्यावयाची असल्याने आवश्यक कागदपत्रे शाळेचे मुख्याध्यापक वा मार्गदर्शन केंद्रातून तपासून घ्यावेत. दहावीच्या निकालानंतर आठवडाभर अर्जाचा भाग एक आणि दोन भरता येईल. अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने घाई करू नये. अशी माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.