नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं कधीही पक्षीय राजकारण केलं नाही. कायम पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन देशाचा विचार केला. हीच परंपरा कायम राखत हा निर्णय घेतल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी पक्षाच्या खासदारांनी परवा मुंबईत झालेल्या बैठकीत केली होती. देशात प्रथमच आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर जाण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे पक्षातले आदिवासी नेते- पदाधिकारी तसंच आदिवासी समाजात काम करणाऱ्या संघटनांनीही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.
यासाठी खासदारांचा कुठलाही दबाव नव्हता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणतंही राजकारण असू शकत नाही, आदिवासी समाजाचे नेते आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांच्या इच्छेचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या ५० आमदारांचा पाठिंबा असल्याची घोषणा काल शिंदे यांनी मुंबईत बातमीदारांसोबत बोलताना केली. यामध्ये शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदारांचा समावेश आहे.