नवी दिल्ली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मालवण, आचरा, वेंगुर्ले आणि देवगड इथं किनारपट्टीलगतच्या भागात उधाणाचं पाणी घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये शिरुन नुकसान झालं आहे.

या वादळाचा  फटका रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीलाही बसला आहे. वादळामुळे  दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरातल्या सुमारे ८० छोट्या होड्या लाटांच्या तडाख्यात वाहून गेल्या. या वादळामुळे परराज्यातल्या सातशे नौका रत्नागिरी किनाऱ्यावर आश्रयाला आहेत. कोकणात झालेल्या या पावसाचा फटका भात शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असून भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

समुद्रावर जाताना जनतेनं काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पुढच्या २४ तासात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.