मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांना मिठाई, फराळ व फटाके वाटून त्यांच्याशी हितगूज केलं.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने येथे नक्षली कारवाया होत असतात. नक्षल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस जवान सतत डोळ्यात तेल ओतून पहारा देत असतात. दिवाळी असो की कोणताही सण, हे जवान आपल्या कर्तव्यावर तैनात असतात. आतापर्यंत जिल्ह्यातले १६६ जवान शहीद झाले आहेत. दिवाळीसारखा सण आल्यास कुटुंबप्रमुख नसल्याने शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मनात अश्रू तरळतात. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून पोलिस विभागातर्फे ‘शहीद कुटुंबीयांसोबत दिवाळी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अजयकुमार बन्सल, सौ.निधी बन्सल, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिठाई, फराळ व फटाके वाटून त्यांच्याशी हितगूज केली.
शहीद जवानांचं बलिदान नेहमीच पोलिस दल आणि जिल्हावासीयांच्या स्मरणात राहील, तसेच नक्षलविरोधी लढ्यात ते प्रेरणा देत राहील, असं पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनीही आपण शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.






