नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उपग्रहांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार आहे. लघु उपग्रह प्रक्षेपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यासाठी बोली प्रक्रियेमार्फत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. इस्रो लघु उपग्रह प्रक्षेपण आणि उत्पादन पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार असल्याचं या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
दहा किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या नॅनो उपग्रहांसाठी आणि शंभर किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या उपग्रहांसाठी लघु उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला जाईल. या माध्यमातून मागणीच्या आधारे उपग्रह प्रक्षेपित करण्याची सुविधा देण्यात येणार असून, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या रॉकेटची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मागच्या वर्षी इस्रोने हिंदुस्थान एरोनॉटिकस आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना पाच उपग्रह निर्माण करण्याचं कंत्राट दिलं आहे.