नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना होणार आहेत. ‘नवोन्मेशशाली भविष्यासाठी आर्थिक वाढ’ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. मोदी या परिषदेत सहाव्यांदा सहभागी होत आहेत.
ब्रिक्स व्यापार मंचात पाच देशांमधले उद्योजक सहभागी होणार आहेत. त्यात भारतीय उद्योग प्रतिनिधीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी स्वतंत्रपणे भेट होणार आहे.
ब्रिक्स परिषदेच्या समारोपाच्या सत्रात सध्याच्या जगात राष्ट्रीय सार्वभौमत्व जपण्याचं आव्हान आणि संधींबाबत प्रामुख्यानं चर्चा अपेक्षित आहे. तर खुल्या सत्रात, आर्थिक विकासाकरता ब्रिक्स देशांमधल्या परस्पर सहकार्याबाबत चर्चा होईल.