मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींचे वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित विभागाला दिले.

मंत्रालयात आज गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनी दावा प्रकरणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. बडोले बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदिवासी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री.बडोले म्हणाले, गोंदिया जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे प्रलंबित असलेले 506 आणि उपविभागीय पातळीवर असलेले 28 दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढावेत. याशिवाय ज्या कास्तकारांनी अपील दाखल केले नाही, त्यांनाही तातडीने अपील दाखल करावयास सांगावे तसेच नामंजूर करण्यात आलेले दावे विशेष मोहिम घेऊन निकाली काढावेत. त्यासाठी जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंबंधिचा आढावा घेण्यात यावा, असेही श्री. बडोले यांनी सांगितले.

ज्यांना वन जमिनीचे पट्टे मिळाले आहेत, त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र परिपत्रक आदिवासी विभागाने निर्गमित करावे, असे निर्देशही श्री.बडोले यांनी दिले.