नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, असं भाजपानं म्हटलं आहे.

पक्षाचे प्रवक्ते डॉ. नूमल मोमीन यांनी काल आकाशवाणीच्या टॉक शोमध्ये बोलताना बोडो कराराबाबत भूमिका मांडली. या करारामुळे या भागात शांतता प्रस्थापित होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आर्थिक पॅकेज आणि पायाभूत सुविधांविषयक कलमांमुळे आसामची भरभराट होईल, अशी अपेक्षा मोमीन यांनी व्यक्त केली. पत्रकार सुशांत तालुकदार देखील या शोमध्ये सहभागी झाले होते.

बीटीसी भागांमध्ये राहणाऱ्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासावर सरकारनं भर दिला पाहिजे, असं तालुकदार यांनी सांगितलं. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे नेते परेश बरुआ यांनी देखील शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं ते म्हणाले.