नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्पात सुचवलेल्या नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत होऊन प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ते काल बोलत होते.

रोजगार निर्मितीकरता केंद्र सरकारनं कृषी, पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञान या चार क्षेत्रांवर विशेष लक्ष्य केंद्रित केलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरता अर्थसंकल्पात एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला असल्याचं त्यांनी सांगितलं.

पारंपरिक पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्यानविद्या, मत्स्यपालन, पशुपालन या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम निश्चित केल्यानं ग्रामीण भागात देखील रोजगार निर्मिती वाढीला लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातही  मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी असून या क्षेत्रासाठी १०० लाख कोटी रुपये खर्चाचे ६ हजार ५०० प्रकल्प येऊ घातले आहेत, त्यायोगे लॉजिस्टिक्स व्यवसायालाही मोठं प्रोत्साहन मिळेल असं ते म्हणाले.

या अर्थसंकल्पामुळे देशाच्या वर्तमानातल्या गरजा पूर्ण होण्याबरोबरच या दशकातल्या भविष्यातल्या अपेक्षा देखील पूर्ण होतील, असं ते म्हणाले. सरकारी नोकऱ्यांसाठी सामाईक ऑन लाईन परीक्षा, किसान रेल, कृषी उडान यांसारख्या योजनांमुळे समाजातल्या विविध घटकातल्या नागरिकांना लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा अर्थसंकल्प नागरिकांचा आणि नागरिकांसाठीचा अर्थसंकल्प असल्यानं यात शक्यतोवर कराचा भार कमी करायचा प्रयत्न केला आहे, जेणे करून सर्वसामान्य जनतेच्या हातात अधिक पैसा येऊ शकेल. विवाद से विश्वास यासारख्या योजनांमुळे कायदेशीर विवाद कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसंच न्यायालयीन प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास दृढ होईल, असं त्यांनी सांगितलं.

या दशकातल्या पहिल्या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या सहकार्यांच अभिनंदन केलं असून कृती आणि दिशा यांचा समन्वय असलेला  सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.