नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत तशी घोषणा केली.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं या विश्वस्त मंडळाचं नाव असेल, आणि जवळपास ६७ पूर्णांक ७ दशांश एकर जमीन त्याच्या नावावर केली जाईल, असं ते म्हणाले. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार, सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन द्यायला उत्तर प्रदेश सरकारनं मान्यता दिली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

आज संसदेत कामकाजाला सुरुवात झाल्याबरोबर त्यांनी ही माहिती दिली. मंदिराच्या बांधकामाविषयी हे विश्वस्त मंडळ, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. अयोध्या निर्णयानंतर भारतीय जनतेनं दाखवलेल्या प्रगल्भतेचं मोदी यांनी यावेळी कौतुक केलं.

लोकशाहीतल्या प्रक्रिया आणि कार्यपद्धतींवर भारतीयांनी उच्च प्रतीचा विश्वास दाखवला आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.