नवी दिल्ली : वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने गुजरातच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून सर्व तयारीचा आढावा घेतला. मुंबई स्थित पश्चिमी नौदल कमांड गुजरातमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. चेन्नई, गोमती आणि दीपक ही नौदलाची जहाजं मुंबईत सर्व आवश्यक मदत साहित्यासह सज्ज असून सुचना मिळताच गुजरातकडे रवाना होतील. याशिवाय या जहाजांवर 5 हजार लिटर पिण्याच्या पाण्याचा साठा ठेवण्यात आला आहे. नौदलाची सात विमानं आणि तीन हेलिकॉप्टर सज्ज आहेत. तसेच वैद्यकीय पथकं आणि बचाव पथकं आवश्यक मदतीसाठी तयार आहेत. द्वारका आणि पोरबंदर येथे सामुदायिक स्वयंपाकघर उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. गरज भासल्यास नौदलाची विमानं आणि हेलिकॉप्टर्स वादळामुळे होणाऱ्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि बेपत्ता तसेच अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.