????????????????????????????????????

मुंबई : महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून एसटी बस सेवेकडे पाहिले जाते. ही सेवा ग्रामीण भागात प्रवाशांना सुरळीतपणे सहज उपलब्ध असली पाहिजे. यावर भर देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण भागातील जनतेला चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

श्री. परब यांनी सकाळी मंत्रालयात परिवहन आणि संसदीय कार्य या विभागांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.

श्री. परब म्हणाले, ग्रामीण भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटी बसने प्रवास करतात, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी शाळा, कॉलेजच्या वेळेत एसटीबस सेवा उपलब्ध असली पाहिजे. याचा विचार करुन वेळेत बस सेवा देण्यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे. जेणेकरुन विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही. महामंडळाने उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या माध्यमातून कमी खर्चात चांगल्या योजना तयार करुन प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह उत्तम सेवा कशी देता येईल याचा विचार करावा. जनतेच्या सेवेसाठी महामंडळाला शासन सहकार्य करेल. प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही श्री.परब यांनी सांगितले.