नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापाराला अलिकडच्या काळात गती मिळाली असून, त्याचा अमेरिकेला लाभ होत असल्याचे अमेरिका – भारत धोरणात्मक भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी म्हटले आहे. भारताच्या उर्जा आयातीच्या प्रमाणात अलिकडच्या काळात वाढ झाल्याने द्विपक्षीय व्यापाराला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांमध्ये कोणताही व्यापारी करार झालेला नसतानाही, तसेच अजुनपर्यंत बोईंग विमानं भारताला मिळायची बाकी असतानाही द्विपक्षीय व्यापार वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत आणि अमेरितला द्विपक्षीय व्यापार २०१८ तुलनेत २०१९ या वर्षात १८ अब्ज अमेरिकी डॉलर्सनं वाढला असल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेनं भारताला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतरही, त्यांच्या निर्यातीत मात्र कोणतीही घट झालेली नाही. भारतात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांमधला उत्साह आजही कायम असल्याचंही अघी यांनी नमूद केलं आहे.