नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोना विषाणू बाधित भागातून मुंबईत आलेल्या ४१ प्रवाशांपैकी ४० जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली. रुग्णालयात निरिक्षणाखाली दाखल असलेल्या ४१ पैकी ३९ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. पुणे आणि मुंबई इथं प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरिक्षणासाठी दाखल आहे.

मुंबई इथल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. राज्यात कोरोना बाधीत भागातून एकूण १७३ प्रवासी आले होते. त्यापैकी ९० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन मधून येणा-या सर्व प्रवाशांना रुग्णालयात भरती करुन पूर्ण तपासणी केली जात आहे. इतर बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा १४ दिवसांकरता वैद्यकीय पाठपुरावा करण्यात येतो आहे.