सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन शिवछत्रपतींचे दर्शन घेतले. किल्ल्यावरील भवानी मातेच्या मंदिरातील भवानी मातेचेही त्यांनी दर्शन घेतले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. काल सिंधुदुर्ग जिल्ह्याची तर मंगळवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक त्यांनी घेतली. पर्यटन विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग किल्ल्याला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
या पाहणीवेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, उप विभागीय अधिकारी वैशाली राजमाने, वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भाई ढोके यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.