नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाची नाही, तर या प्रकरणांच्या  तपासात सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आपल्या पक्षाची असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद या दोन्ही घटना वेगळ्या आहेत. एल्गार परिषदेतील काही लोकांची, साहित्यिकांची भाषा आक्रमक असली तरी त्यांना देशविरोधी म्हणता येणार नाही असं ते म्हणाले. एल्गार परिषदेत शंभरहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि त्यांना तुरूंगात टाकलं असं पवार म्हणाले. या प्रकरणात अशा रितीनं पुरावे  तयार करण्यात आले, की त्यामुळे त्यांना जामीन मिळाला नसल्याचा आरोपही पवार यांनी केली. आयोगामार्फत भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येईल, त्यावर आज भाष्य करणं योग्य नाही ता येणार नाही असं पवार म्हणाले.