नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये साऊथ वेस्ट विद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी चीनच्या राजदुतांकडे अलीकडेच उपस्थित केला होता.
या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गांमध्ये हजर व्हावं, नाहीतर त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल असं चीनमधल्या विद्यापीठांनी सांगितलं होतं.
घातक कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन नवं शैक्षणिक सत्र स्थगित करण्याचा निर्णय चीनच्या राज्य परिषदेने घेतला आहे, अशी माहिती चिनी दुतावासानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिली आहे.
याविषयी विद्यार्थ्यांना त्यांची विद्यापीठं माहिती देतील. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात हजर होण्याच्या सूचना या विद्यापीठांनी केल्या होत्या.