नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे सदनाचं काम वारंवार बाधीत झालं. दिवंगत सदस्यांच्या स्मरणार्थ सकाळच्या स्थगितीनंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरुन गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जोरदार गदारोळ केला. काँग्रेसचे गौरव गोगोई यांच्यासह काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या बाकांकडे काळे फलक घेऊन धावले.
भाजपाचे निशिकांत दुबे यांच्यासह काही जणांनी त्यांना विरोध केला, यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काँग्रेसच्या काही सदस्यांनी कागद फाडून हवेत भिरकावले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी तसंच राहुल गांधी यावेळी सदनात उपस्थित होते. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
दरम्यान, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी याप्रकाराबाबत खेद व्यक्त करत, सदनात आज झालेल्या प्रकारामुळे आपण व्यथित झाल्याचं म्हटलं आहे. सदनाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सर्व सदस्यांची असून, प्रत्येकानं तसा संकल्प करावा, असं आवाहन बिर्ला यांनी केलं. राज्यसभेचं कामकाजही दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.