नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या मेलबोर्न इथं झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला ८५ धावांनी पराभूत करुन विश्वचषकावर नाव कोरलं. यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती.
सलामीच्या एलिसा हेली आणि बेथ मूनी या दोघींनी ११५ धावांची मजबूत भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाची जोरदार सुरुवात केली. एलिसानं अवघ्या ३९ चेडूत ३ षटकारांसह ७५ धावा तर बेथ हिनं ५४ चेंडूत ७८ धावा फटकावल्या. अखेरीस राधा यादवच्या चेंडूवर वेदा कृष्णमूर्तीनं एलिसाचा झेल टिपत ही भागीदारी संपुष्टात आणली.
ऑस्टेलियानं विजयासाठी भारतासमोर १८५ धावाचं आव्हान ठेवलं होतं. मात्र सुरुवातीपासूनच भारताचा डाव गडगडत गेला. शेफाली वर्मा दोन धावांवर आणि स्मृती मानधना ११ धावांवर तंबूत परतल्यानंतर अवघ्या १९ षटकं आणि एका चेंडूत ९९ धावांसह संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय संघाला तंबूत धाडलं.