नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज पहाटे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं.
न्यायालयानं कपूर यांना ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. चौकशीत सहकार्य करत नसल्यानं कपूर यांना अटक केल्याचं आल्याचं संचालनालयानं सांगितलं. पुरावे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी काल त्याच्या तीनही मुलींच्या घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली.
मुंबईत वरळी इथल्या त्याच्या घरावर देखील छापा मारण्यात आला. कपूर यांची कालपासून २० तास कसून चौकशी केली गेली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलींचीही चौकशी झाली. डी. एच. एफ एल. या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं ६०० कोटी रुपयांचं कर्ज वितरित केल्याचा आरोप राणावर आहे. तसंच काही कार्पोरेट कंपन्यांना बेकायदेशीररित्या कर्ज दिल्यानंतर राणाच्या पत्नीच्या खात्यावर लाच मिळल्याचाही आरोप आहे.
गुरुवारी रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध आणल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं या कारवाईला सुरुवात केली. भारतीय स्टेट बँक येस बँकेचे ४९ टक्के समभाग विकत घेणार आहे.