नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत मंत्रीसमुहाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राजदूत, अधिकारी, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था, रोजगार आणि प्रकल्पासंबंधिचे व्हिसा वगळता इतर सर्व व्हीसा रद्द केल्याचे यावेळी जारी केलेचे निवेदनात म्हटले आहे. चीन,  इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशातून १५ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या सर्व परदेशी आणि भारतीय नागरिकांना १४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जाणार आहे.

भारतीयांनी परदेशात जाणे टाळावे असे अवाहनही केंद्र सरकारने केले आहे. इटलीतून आलेले विद्यार्थी आणि इतर पर्यटकांचे नमुने तपासले जात आहेत. ज्यांना कोरोनाची बाधा झाली नाही त्यांना तपासणीनंतर फिरण्याची मुभा देण्यात आली आहे.