नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मांडयांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस बळाचा वापर करून कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचं उल्लंघन केल्या प्रकरणी विविध जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ३१ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं मुंबई पोलीस प्रवक्ते आणि उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलं.
पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी काही हॉटेलमालक, डॉक्टर, चपलांची दुकानं आदींवर मिळून १८० गुन्हे दाखल केले आहेत.
रायगड जिल्ह्यांत दुचाकी आणि चारचाकी घेऊन फिरणार्यां 512 वाहन चालकांवर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २७ हजार ४०० रुपये वसुल करण्यात आले.
लातूर जिल्ह्यांत आशा आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांची विचारपूस करीत आहेत. कुठे अनियमितता दिसली तर थेट कारवाई करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अनावश्यक मोटारसायकली फिरवणाऱ्यांवर निर्बंध लादून पोलिसांनी २२ मोटारसायकली जप्त केल्या.
नांदेड जिल्ह्यात सरकारी आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी १८ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.