विविध विभागांमध्ये हंगामी डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाची भरती सुरू

कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी 5000 खाटांची सुविधा असलेली 17 समर्पित रुग्णालये आणि रेल्वेच्या 33 रुग्णालयातले ब्लॉक्स सज्ज

नवी दिल्ली : कोविड-19 च्या विरोधात भारत सरकारचे सर्व विभाग जोरदार लढाई देत आहेत. रेल्वे मंत्रालया तर्फे  विविध स्तरावर आपले सर्वतोपरी योगदान सरकारला दिले आहे.रेल्वेच्या रुग्णालयाची सर्व साधनसामुग्री कोविड-19 बरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज असून, रेल्वे रुग्णालयाच्यावतीने अतिरिक्त डॉक्टर्स, तसेच इतर वैद्यकेतर कर्मचारी वर्ग यांची हंगामी भरती सुरू करण्यात आली आहे. देशभरामध्ये शक्य आहे तिथे रेल्वे प्रवासी बोगींचे अलगीकरण कक्षामध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. या बोगींमध्ये विलगीकरणाचा सल्ला दिलेल्या कोरोनाग्रस्ताला आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  स्थानिक पातळीवर बनवलेले सुरक्षा साधने आणि व्हँटिलेटर्स यांचीही सोय करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या आरोग्य सेवेला पुरक सुविधा रेल्वेच्यावतीने देण्याची सिद्धता रेल्वे मंत्रालयाने केली आहे. रेल्वेकडे 586 आरोग्य विभाग आहेत. तसेच 45 उपविभागीय, 56 विभागीय रुग्णालये आहेत. रुग्णालयांसाठी लागणा-या उत्पादनांचे 8 प्रकल्प रेल्वेकडे आहेत. तसेच संपूर्ण देशात रेल्वेचे 16 क्षेत्रिय रुग्णालये आहेत. या सर्व सुविधांचा महत्वपूर्ण भाग आता कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

रेल्वेच्या वैद्यकीय विभागामध्ये एकूण 2,546 डाॅक्टर्स आहेत आणि 35,153 निमवैद्यकीय, औषध विभागातले मिळून कर्मचारी आहेत. या सर्वांच्या मदतीने रेल्वेने कोविड-19च्या विरुद्धच्या लढ्याचे आव्हान पेलण्यास सिद्धता केली आहे. नव्या उपक्रमानुसार रेल्वे आरोग्य सेवा देशभरातल्या सर्व केंद्र सरकारच्या कर्मचारी वर्गाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक, विशिष्ट आणि पुढच्या टप्प्यातल्या विशेष सेवांचा समावेश आहे.

कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढील प्रमाणे तयारी केली आहे-

1.         विलगीकरणाचा सल्ला दिलेल्या रुग्णांसाठी रूपांतरीत केलेल्या पाच हजार बोगींमध्ये एकूण 80 हजार रुग्णांची सोय केली आहे. यामध्ये सर्व वैद्यकीय सुविधा तयार केल्या आहेत. यासाठी सर्व कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. आत्तापर्यंत 3250 बोगींचे रूपांतराचे काम पूर्णही झाले आहे.

2.         कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या 17 समर्पित रुग्णालयांमध्ये जवळपास 5,000 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वे रुग्णालयातले 33 ब्लाॅक्सही कोविडच्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

3.         11,000 विलगीकरण खाटा – भारतीय रेल्वे प्रशासनाने कोविड-19च्या विरुद्ध लढण्यासाठी 11000 खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत.

4.         वैद्यकीय उपकरणे- व्हँटिलेटर आणि वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धता – कोविड -19 च्या विरुद्ध लढा देण्यासाठी व्हँटिलेटर आणि वैयक्तिक सुरक्षा साधनांची पुरेशी उपलब्धता करून दिली आहे. या वैद्यकीय गरजांच्या पूर्तीसाठी रेल्वे विभागांचे जे उत्पादन प्रकल्प आहेत, त्यामध्ये निर्मिती केली जात आहे.

5.         रेल्वेने वैयक्तिक संरक्षणात्मक साधनांची निर्मिती आपल्या प्रकल्पांमध्येच सुरू केली आहे. यामध्ये दररोज 1000 संचांची निर्मिती केली जाते. नजिकच्या काळात आवश्यकता भासल्यास हे उत्पादन वाढवण्यात येणार आहे.

6.         केंद्र सरकारच्या सर्व कर्मचारी वर्गांसाठी रेल्वे आरोग्य सेवा उपलब्ध उपलब्ध असणार आहे. त्यासाठी केंद्रीय कर्मचारी वर्गाला रेल्वेच्या आरोग्य केंद्रावर ओळखपत्र सादर करावे लागणार आहे.