नवी दिल्ली : कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या मृत्यूचं विश्लेषण करणं आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागानं मुंबई अणि परिसरासाठी तसंच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
राज्यात आणि मुंबई परिसरात ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठवणं तसंच  समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे.
मुंबई शहर आणि  परिसरात कोरोनाची विषाणूबाधा आणि  मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना आणि विश्लेषण करण्यासाठी  सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. के. ई. एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी असतील. मुंबई वगळून उर्वरित राज्यासाठीच्या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक या समितीचे अध्यक्ष असतील.