नवी दिल्ली : घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. न्याय आणि समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला, त्यांचं द्रष्टेपण आणि मूल्यांपासून प्रेरणा घेत त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करुया, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. नायडू यांनी कार्यालयात बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण केली. स्वातंत्र्यानंतर देशाला एक नवी दृष्टी देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, समता आणि सामाजिक सलोख्यावर त्यांनी नेहमी भर दिला, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.

मुंबईत कोरोनाचे संकट निर्माण झाल्यानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मुंबईत सर्वांनी घरीच राहून साजरी केली. चैत्यभूमीवर दरवर्षी राज्यपालांसह मुख्यमंत्री बाबासाहेबांना अभिवादन करतात. यंदा कोरोनाच संकट असल्यानं चैत्यभूमीवर वास्तव्याला असलेल्या भिक्कूंनी अभिवादन केल. मुंबईत आज सकाळी आंबेडकरी अनुयायांनी घरोघरी बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं. गोडधोड करून जयंतीचा उत्सव साजरा केला. जयंतीच्या निमित्तानं गरिबांना अन्नदानही केलं जात आहे.

औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात सामाजिक सुरक्षित अंतर ठेऊन जयंती साजरी करण्यात आली. औरंगाबाद महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात, महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं. वाशिम इथं सामाजिक सुरक्षित अंतर राखून जयंती साजरी करण्यात आली.

नाशिकमध्ये आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म इथं, तर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. बहुतांश लोकप्रतिनिधींनी घरीच प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

सांगली जिल्ह्यात आरग इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर आज प्रथमच अस्थींचे दर्शन बंद ठेवलं आहे. तिथं कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून अनेक लोक स्मारकाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लावण्यात आलेल्या जमावबंदी कायद्याअंतर्गत, बंदी असल्यानं हे स्मारक बंद ठेवलं आहे.

लातूर इथं संसदीयकार्य राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. खासदार सुधाकर राव शृंगारे यांनीही त्यांच्या लातुरातल्या निवास्थानी बाबासाहेबांना अभिवादन केलं.

अमरावती जिल्ह्यात नागरिकांनी आपापल्या घरीच जयंती साजरी केली. नांदेड इथं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबीरात १५० जणांनी रक्तदान केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी आणि डिजिटल पद्धतीनं साजरी करण्यात आली.
सद्यपरिस्थितीमुळे या भीमजयंतीला बाहेर निघून दरवर्षीप्रमाणे शाहिरी जलसे करणे शक्य नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत, आहेत त्या साधनांनिशी *लोकायत आणि काफ़िला* नं घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करायचं ठरवलंय. त्यासाठी त्यांनी दोन फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केलेत.