नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी देशात लागू केलेली टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे सुरू असून कोरोनामुळे होणारं मोठं नुकसान टाळण्यात देश यशस्वी ठरला असल्याचं पंतप्रधानांनी आज देशाला संबोधित करताना सांगितलं. पुढच्या एका आठवड्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवली जाईल,असं मोदी यांनी सांगितलं. लॉकडाऊन संदर्भात सरकार तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी करेल.

जिल्हा, तालुका, गाव पातळीवर विशेषतः हॉटस्पॉट क्षेत्रात बारकाईनं लक्ष ठेवणार असून, नियमांचं उल्लंघन झालेलं आढळलं तर कठोर कारवाई करणार आहे. जिथे लॉकडाऊनचं पालन काटेकोरपणे होईल, आणि साथीला आळा बसल्याचं दिसेल अशा ठिकाणी 20 एप्रिल पासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले जातील, असं प्रधानमंत्री म्हणाले.

कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात जनतेने आतापर्यंत त्रास सहन करुनही शिस्तीचं पालन केल्याबद्दल मोदी यांनी आभार मानले. या लढाईत प्रसंगी जिवाचा धोका पत्करुन योगदान देणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य सेवकांच्या कार्याला त्यांनी अभिवादन केलं.

कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन केल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी प्राण वाचवायचे तर इतर पर्याय नाही असं मोदी म्हणाले. कोवि़ड 19 विरुद्धच्या लढ्यात 7 मुद्दयांवर जनतेनं सहकार्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.

लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन, स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या प्रकृतीची काळजी घेणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं, गरीब आणि गरजूंना मदत करणं या बाबींचा त्यात समावेश आहे.