नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून देशव्यापी टाळेबंदी येत्या तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या.  20 एप्रिल नंतर काही ठिकाणी निर्बंधामध्ये सूट देण्यात येईल. मात्र अतिसंवेदनशील हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये या सवलती मिळणार नाहीत.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या औद्योगिक आस्थापना चालू राहतील. विशेष आर्थिक क्षेत्र आणि निर्यातभिमुख क्षेत्रांतल्या कारखानदारांनी कामगारांच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करून कारखाने चालू ठेवायला हरकत नाही. अन्नप्रक्रिया उद्योग, जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन, औषधं, वैद्यकीय उपकरणं त्यांच्यासाठीचा कच्चामाल आणि इतर साहित्य निर्माण करणारे कारखाने चालू राहतील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले हार्डवेअरचे कारखाने चालू राहतील. कोळसा, खनिकर्म आणि खनिकर्मासाठी आवश्यक साहित्याचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या चालू राहतील. या सर्वांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे. रस्ते, जलसिंचन, इमारती बांधकाम, इतर औद्योगिक प्रकल्प तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग चालू राहतील. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प चालू राहतील.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात जिथे बांधकामावर मजूर उपलब्ध असतील आणि बाहेरून आणण्याची आवश्यकता नसेल तिथे बांधकाम चालू राहील. जीवनावश्यक वस्तूंच्या ने- आणी साठी चारचाकी वाहनांमध्ये चालकाखेरीज एक जण तर दोन चाकी वाहनावर केवळ चालक यांना प्रवास करायला परवानगी आहे.
राज्य शासनातही कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ठेवायची आहे. या मार्गदर्शक सूचना सूचनांचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकाऱ्याना दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध प्रकारच्या शिक्षणाची तशीच दंडाची तरतूद केली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांनाही जबर दंड भरावा लागेल.
निर्बंधांमधून जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन, वाहतूक आणि विक्री वगळली आहे. शेतीच्या कामांवर निर्बंध नाहीत. शेतमालाची खरेदी-विक्री, शेतीची अवजारे, खत, जंतुनाशक आणि बियाणं यांचं उत्पादन आणि वितरण तसंच यासाठी मनुष्यबळाची ने-आण करण्यावर निर्बंध नाहित. डेअरी आणि पोल्ट्री यांच्यावर निर्बंध नाहीत. बँका चालू राहतील. थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत सर्व रक्कम जमा होईपर्यंत बँकांचे कामकाज नेहमीच्या वेळात चालू राहील. बँकेच्या शाखांना स्थानिक प्रशासन सुरक्षा देईल.
तोंडाला मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर मनरेगाची कामे चालू राहतील. याच अटींवर किराणा मालाची दुकानं, डेऱ्या, भाजी बाजार, तसेच पशुखाद्याचे बाजार चालू राहतील.