नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेपो दरात कपात करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारात पैसा खेळता राहील तसंच पतपुरवठ्यात वाढ होईल असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांचं स्वागत केलं आहे.
रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आपलं धोरण जाहीर करताना या क्षेत्राचा विचार करून, विविध यंत्रणांमार्फत ५० हजार कोटी रुपयांचं पुनर्भांडवल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रिझर्व्ह बँकेचे आभारही मानले आहेत.