नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यान देशभरातील लॉकडाउनच्या काळात धान्यासारख्या अत्यावश्यक गरजेच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून रेल्वेची मालवाहतूक सेवा पुर्णपणे कार्यरत आहे.

भारतीय नागरिकांचे स्वयंपाकघर सुरळीत चालावे म्हणून 17 एप्रिल 2020 रोजी 58 ते साठ टन धान्य भरलेली एक, अश्या 3601 वाघिणी (वैगन) लादलेले एकूण 83 रेल्वेरेक्स माल रेल्वेने वाहून नेला. तर एकूण 25 मार्च ते 17 एप्रिल या आतापर्यंतच्या लॉकडाउन कालावधीत 1500 पेक्षा जास्त रेक्स आणि 4.2 दशलक्ष टन धान्यसाठ्याची वाहतूक केली.

धान्यासारखा शेतमाल तत्परतेने उचलला जावा आणि कोविड-19 ला रोखण्यासाठीच्या देशव्यापी लॉकडाउनमध्ये वेळेवर धान्यपुरवठा व्हावा यासाठी रेल्वेसेवा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.  हा अत्यावश्यक माल भरणे, तो वाहून नेणे आणि उतरवणे ही कामे लॉकडाउनमध्येही जोमाने सुरू आहेत. धान्य भरण्यासाठी कृषी विभागाशी वेळोवेळी संपर्क  ठेवला जात आहे.  डाळींचा भरपूर  पुरवठा व्हावा म्हणून मोठया प्रमाणावर त्यांच्या वाहतूकीसाठी कॉनकॉर (CONCOR) आणि नाफेड (NAFED) कार्यरत आहेत

लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच्या कालावधीत फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असा नाशवंत माल तसेच  कृषीक्षेत्रासाठी उपयुक्त बी-बियाणे वाहून नेण्यासाठी  भारतीय रेल्वेने आणखी 65 मार्गांवर पार्सल-विशेष गाड्यांमधून मालवाहतूक सुरू केली आहे.  17 एप्रिल पर्यंत अश्या 66 मार्गांची नोंद झाली आहे आणि त्या मार्गांवर वेळापत्रक पाळत रेल्वे मालवाहतूक सुरू झाली आहे. देशातला कोणताही  प्रदेश या सेवेपासून वंचित राहू नये म्हणून जिथे मागणी कमी आहे, तिथेही मालगाड्या सुरू आहेत.

या मार्गात असणाऱ्या सर्व ठिकाणी शक्यतोवर थांबे दिले जात आहेत, जेणेकरून जास्तीत-जास्त मालाचा पुरवठा सर्वदूर व्यवस्थितपणे होईल.